शिक्षण क्षेत्रातील कोहिनूर राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक कुमावत


शिक्षण क्षेत्रातील कोहिनूर
राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक कुमावत सर यांच्या सोहळ्यानिमित्ताने त्यांच्या 36 वर्षाचा अविस्मरणीय लेखाजोखा.

Advertisement

 


राष्ट्रपती पुरस्कार विजेते लेखक, कवी, मोटीव्हशनल स्पीकर, सूत्रसंचालक अशोक कुमावत यांचा सेवापूर्ती सोहळा प्रचंड उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला.
नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव सारख्या छोट्याशा खेडेगावात अत्यंत गरीब कुटुंबात लक्ष्मण बेलदार/ कुमावत या गवंडी कामगाराच्या अठरा विश्व दारिद्र असलेल्या घरात त्यांचा जन्म झाला.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही असं म्हटल जात. हेच बाळकडू आई बापानं त्याच्या नसानसात पेरले.अत्यंत हलाखीचे जीवन,दोन वेळचे जेवण कधी माहित नाही,मोलमजुरी करत,रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामावर मिळत असलेली सुकडी हेच सायंकाळचे जेवण,तीन भाऊ,चार बहिणी असे सात भावंडांचे मोठे कुटुंब , सणावाराला अंगात कधी नवा कपडा माहित नाही,आयुष्यभर फाटक्या वस्त्रात काढलेला हा बाप संसाराचा गाडा हाकताना कधी डगमगला नाही.कष्टाची अन संस्काराची भरभक्कम शिदोरी आपल्या मुलांना देणारा दरिद्री शेतमजूर. शिक्षणाचे महत्त्व माहित नसताना या भोळ्या भाबड्या आई बापानं पोरांना मात्र शिक्षण नावाच्या वाघिणीचे दूध पाजले.
असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर.
या उक्तीप्रमाणे मोठा मुलगा अशोक कुमावत हा 1989 साली कोटमगाव तालुका निफाड येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीला लागला.तसे या अवलियाने मागे वळून बघितलेच नाही. स्वतः शिकून दोन्ही भावना आदर्श शिक्षक बनविले.बहिण भाचे यांना शिकवून कुटुंबाला पुढे घेऊन जाण्यासाठी सतत संघर्ष करत राहिले.
एकच ठावे काम मला
प्रकाश द्यावा संकलाना
कसलेही मज रूप मिळो
देह जळो अन् जग उजळो!
या ओळींप्रमाणे त्यांनी आयुष्यभर फक्त विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश पेरला.
त्या नंतर निफाड मध्ये ब्राम्हणगाव विंचूर, मरळगोई खुर्द या शाळेवर , ठाणगाव तालुका येवला आणि शेवटी इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब या गावात आपली भूमिका प्रामाणिकपणे साकारली.
जिथे जिथे काम केले त्या प्रत्येक गावातील विद्यार्थी आणि गावकरी यांच्या मनात आदराचे स्थान मिळविले.सर्व शाळांच्या विकासासाठी अटोकाट प्रयत्न करून शाळांचा कायापालट करण्यात सरांचा सिंहाचा वाटा होता. प्रत्येक शाळा ही गुणवत्ता विकासात प्रथम येण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.
शिष्यवृत्ती परीक्षेत सतत विद्यार्थी यशस्वी करून गुणवत्ता यादीत आणणे,गरीब विद्यार्थ्यांना समाजाकडून लेखन साहित्य,गणवेश मिळवून देणे,शाळेला भौतिक सुविधा समाजामार्फत उपलब्ध करून देणे हे तर आयुष्यभर जोपासले.
सलग 28 वर्षे विज्ञान प्रदर्शनात सहभाग आणि अनेक वेळा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर बक्षिसे मिळविली.सातत्याने स्वतः 21 वर्षे न थांबता रक्तदान केले त्यासाठी शिबिरे घेतली,इतरांकडून विविध माध्यमांचा वापर करून रक्तदान करून घेतले.
गावोगावी ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत विविध प्रकारची कामे केली.साक्षरता अभियान अंतर्गत निफाड तालुक्यातील 40 गावांमध्ये रात्रीचे वर्गभेटी व पथनाट्यांद्वारे जनजागृती केली. अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमेत सातत्याने सहभाग घेतला व स्वतः विविध प्रकारचे कार्यक्रम राबविले,स्वतः व्याख्याने देऊन समाजात जनजागृती केली.विद्यार्थ्यांसाठी स्व – निर्मित जवळपास 250 हस्तपुस्तिकेची निर्मिती केली आणि समृद्ध वाचनालय उभे केले. त्यांचा लेखन कौशल्यावर मोठा प्रभाव होता. आतापर्यंत त्यांच्या नावावर स्वतःची 7 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.यातील उठा तुम्हीही जिंकणारच हे पुस्तक महाराष्ट्रभर गाजले आणि सातासमुद्रापार पोहोचले.कोरोनाकाळात सलग नॉनस्टॉप 1000 लेख लिहून नवा उच्चांक केला.अडीच महिन्यात पुस्तकाच्या 2000 प्रति महाराष्ट्रभर पोहचल्या व दुसरी आवृत्ती काढावी लागली.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष चषक स्पर्धा 1997 साली जिल्ह्यात सुरू करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. अध्यक्ष चषक स्पर्धेत विविध कला,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थी सातत्याने एकही वर्ष न थांबता जिल्ह्यात नावलौकिकास पात्र ठरविले व शेकडो बक्षिसे जिंकली.सर्व शाळांमधील विद्यार्थी खेळांमध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पोहचवली. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता त्यांचे विद्यार्थी कीर्तनकार,नाटककार, सैनिकिसेवा,नेतृत्व,संपादक, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक अशा विविध पदावर यशस्वीपणे कार्यरत आहेत. शैक्षणिक साहित्य निर्मिती, शिष्यवृत्ती कार्यशाळा,टेलिकॉन्फरन्स,
गीतमंच, बालभवन, बाहुली नाट्य,भारतीयम,स्काऊट गाईड,योगासने वर्ग,स्वाध्याय संध्या,अशा विविध प्रशिक्षणामध्ये राज्य पातळीपर्यंत तज्ञ मार्गदर्शक म्हणून यशस्वी भूमिका बजावली.
सतत 36 वर्षे हा अवलिया न थांबता न चुकता फक्त आणि फक्त शिक्षकी पेशाला योग्य न्याय देण्यासाठी झगडत राहिला. या सर्व कार्याची दखल जिल्हा परिषद नाशिक यांनी घेतली व 2004 साली आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले.पुढे जाऊन त्यांच्या कार्याची ख्याती राज्यभर पसरली आणि 5सप्टेंबर 2011 रोजी त्यांना तत्कालीन देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. एवढा मोठा सन्मान मिळाल्यानंतर एखादा मनुष्य थोडा थांबून गेला असता परंतु शेकडो पुरस्कार मिळवून देखील ते 31 ऑगस्ट 2025 रोजी प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत होईपर्यंत धडाकेबाज कामगिरी करत राहिले.
त्यांचे सामाजिक कार्यातील योगदान खूप मोठे आहे.कुमावत समाजाचे राज्य सचिव,कुमावत वेब पोर्टलचे संपादक,भटक्या विमुक्त जमाती संघटन,मराठी साहित्य परिषद संघटक,प्राथमिक शिक्षक समिती राज्य पदाधिकारी आणि नुकतीच निवड झाली ते बारा बलुतेदार महासंघाचे प्रमुख राज्य प्रवक्ते अशा विविध पदावर यशस्वीपणे कार्यरत आहेत.गेल्या 36 वर्षात कधीही दीर्घ रजा न घेतलेला हा माणूस आजही त्याच ताकदीने काम करत आहे याचा सर्व शिक्षक वर्गाला,आणि समाज बांधवांना सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाला उपस्थित खासदार ,आमदार,
नगरसेवक ,शिक्षक जनसमुदाय, शिक्षक नेते,समाजातील राज्यभरातील कुमावत बांधव,साहित्य क्षेत्रातील मान्यवर,राजकीय पक्षाचे नेते ही सर्व आयुष्यभर केलेल्या कामाची पावतीच म्हणावी लागेल.
असा दिमाखदार सोहळा क्वचितच शिक्षकांच्या नशिबात असतो आणि अशोक कुमावत सर हे शिक्षण क्षेत्रातील कोहिनूर होते हे या वरून सिद्ध झालं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!