रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्थात मोहम्मद पैगंबर साहेब त्यांच्या जयंती निमित्ताने….. महाराष्ट्राची गंगा जमुनी तहजीब
रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्थात मोहम्मद पैगंबर साहेब त्यांच्या जयंती निमित्ताने…..
महाराष्ट्राची गंगा जमुनी तहजीब
भारतीय भूखंड हा मिश्र संस्कृतीचा देश आहे.या भूखंडावर खैबर खिंडीच्या मार्गे, म्यानमार मार्गे आणि समुद्र मार्गे, अशा तीन मार्गांनी विविध पंथ, संप्रदाय, धर्म आणि वंशाचे लोक येऊन राहिले आहेत. काही वंश, टोळ्या या मातीत मिसळून गेल्या, तर काहींनी आपले वंशशुद्धत्व कायम ठेवण्याचाही प्रयत्न केलेला आहे. काही समुदायांनी आपले सण-उत्सव वेगळे जपून ठेवले आहेत, तर काहींनी वेशभूषा-खानपान आजतागायत जपले आहे. काहींच्या प्रार्थनापद्धती, देव भिन्न आहेत, तर काहींच्या संस्कृतीत निसर्ग-प्राण्यांची पूजा आहे.
अशा प्रकारे भारत हा संघर्ष आणि समन्वयातून विकसित झालेला देश आहे. टोकाचे संघर्ष करून झाल्यावर आपण एकमेकांना समजून घेऊन, सलोख्याने राहू हा निष्कर्ष सामुदायिकरीत्या मान्य करून हा देश उभा राहिलेला आहे. सुरुवातीच्या काळात सिंधू संस्कृतीवर आर्यांच्या टोळ्यांनी हल्ले करून ती जाळून नष्ट केलेली आहे. त्यानंतर भारतीय सभ्यता समजून घेऊन भारतात आर्य स्थिरावले आहेत. स्थानिक गण-टोळ्यांचेही संघर्ष वारंवार झालेले आहेत. नागांचे खंडवण कृष्ण-अर्जुनाने जाळल्याचे आपण जाणतोच. तरीही नाग आणि कृष्णाच्या यादवांचाही वंशसमूह देशात समन्वयाने राहातोच की !
आशाच प्रकारे भारताच्या भूखंडावर सुफी इस्लाम सांगण्यासाठी समन्वयाच्या भूमिकेतून आले, तर खैबर खिंडीतून मुस्लिम राज्यकर्ते साधन संपत्तीच्या लालसे पोटी हा प्रदेश लुटायला आले होते. त्याही आधी केरळ किनारपट्टीवर सहाबा लोक व्यापाऱ्यांद्वारे इस्लाम घेऊन आलेले आहेत. याही कालखंडात प्रचंड संघर्ष झाला आणि समन्वयाची भूमिका घेऊन एक संस्कृती विकसित झाली. या समन्वयातून, सहचर्यातून विकास पावलेल्या संस्कृतीचे नाव गंगा-जमुनी तहजीब होय. एकमेकांच्या संस्कृतीचा प्रभाव परस्परांवर पडल्यानंतर तो प्रभाव मान्य करून, स्वीकारून ही गंगा-जमुनी तहजीब आकाराला आलेली आहे. सुफी आणि इस्लामच्या आगमनानंतर भारतात शिल्पकला, गायन वादन, विणकाम रंगारंगोट्या, आदींचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला होता. स्थानिकची संस्कृती आणि बाहेरून आलेल्यांच्या संस्कृतीचा समन्वयच या विकासाला कारणीभूत ठरला होता. गंगा जमुनी तहजीब ही दोन भिन्न संस्कृतीच्या लोकांना एकत्रित आणणारी परंपरा म्हटली जाते.
काय आहे ही गंगा-जमुनी तहजीब ?
गंगा आणि यमुना या दोन नद्यांच्या नावावरून ‘गंगा-जमुनी तहजीब’ हे नाव पडलेले आहे. तहजीब म्हणजे सभ्यता किंवा संस्कृती होय.
गंगा नदीच्या किनाऱ्यावर भारतीय संस्कृती स्थिरावलेली, विकास पावलेली आहे. मूळ भारतीयांची मुख्य धर्मस्थळे, तीर्थक्षेत्रे गंगा नदीकिनाऱ्यावर आहेत. गंगोत्री, हरिद्वार, ऋषिकेश, काशी, प्रयागराज आदी ठिकाणे गंगा नदीकिनारी आहेत. त्यामुळे गंगा नदी किनाऱ्यावरची एक स्वतंत्र सभ्यता मानली जाते. तर यमुना नदीकिनारी इस्लामी संस्कृती स्थिरावलेली, विकास पावलेली दिसते. दिल्ली ही यमुना किनारी असल्यामुळे येथे मुस्लिम राज्यकर्ते आणि सुफींचा निवास राहिलेला आहे. त्याचबरोबर आग्रा ताजमहल, अकबर मकबरा, इटावा, अलीगढ, फतेहपूर ही ठिकाणे यमुना नदीकिनारी असल्यामुळे. यमुनेच्या संस्कृतीशी जोडलेली आहेत.
या दोन भिन्न संस्कृती गंगा-यमुना नद्यांच्या रूपाने पुढे प्रयागराज येथे संगम पावतात. त्यांचे मिलन होते. त्या एकमेकांत मिसळतात आणि एक नवी सभ्यता विकसित होते, जिचे नाव गंगा-जमुनी तहजीब होय. परस्परविरोधी किंवा भिन्न संस्कृतीच्या मिलनातून अधिक उन्नत कला साहित्याची निर्मिती या गंगाजमुनी तहजीब मधून झालेली आपल्याला दिसून येईल.
आपण माणूस म्हणून एक आहोत. भलेही आपली भाषा, खानपान, आस्था, प्रतीके, धर्मस्थळे, राहणीमान भिन्न असेल, तरीही आपण माणुसकीला प्राधान्य दिले पाहिजे. एकमेकांना समजून घेतले पाहिजे; समन्वयाने, सलोख्याने, प्रेमाच्या नात्याने एकत्र राहिले पाहिजे. हा गंगा-जमुनी तहजीबचा सार मानला जातो. कुणाचाही द्वेष न करता, आहे तसे स्वीकारणे, कोणतीही मोजपट्टी न लावता भेदांसह जुळवून घेणे आणि एकोप्याने राहणे म्हणजे ही गंगा जमुनी तहजीब होय.
भारतीय संस्कृती आणि इस्लामी संस्कृतीच्या समन्वयाच्या, सलोख्याच्या दुव्यासाठी गंगा-जमुनी तहजीब हा शब्दप्रयोग केला जातो. या दोन नद्यांवरून पडलेले नाव पुढे जगभर समन्वयासाठी वापरले जाऊ लागले आहे. वारंवार वापरले गेले आहे.
संपूर्ण भारत हा या तहजीबचे उदाहरण म्हणून मानता येईल. देशातील प्रत्येक राज्यात बहुविध, मिश्र संस्कृती, परंपरा, वंश, समुदाय समन्वयाने एकत्र नांदतात. विविध धर्मही स्वतःची वेगळी ओळख जपत इतरांचे मोठेपण मान्य करताना दिसतात.
भारतामध्ये सुफी आले तेव्हा त्यांना भारतीय संस्कृतीच्या अनेक गोष्टी आवडल्या होत्या. मनाला भावल्या होत्या. भारतीय संगीताच्या तर ते प्रेमात पडले होते. भारतीय अनेक सणवार – उत्सव त्यांनी जाहीर स्वीकारले होते. हजरत निजामुद्दीन औलिया र.अ. यांच्या दर्गाहमध्ये वसंत पंचमी आणि दिवाळी साजरी केली जाते, तर लखनऊच्या बाराबंकीच्या दर्गाहमध्ये होळी-रंगपंचमी साजरी केली जाते. स्वतः हजरत हाजी वारीस शाह र.अ. यांनी ही रंगपंचमी साजरी केली होती. तो उत्सव त्यांनीच सुरू करून दिला होता. अजमेर येथे आलेले हजरत ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन चिस्ती र. अ. यांनी भारतीय संगीत जाहीररीत्या स्वीकारले आणि आपल्या प्रत्येक चिस्ती परंपरेच्या मठात या ‘गाना बजाण्याला ‘ परमिशन दिली होती. चिस्तीच्या मठात प्रवेश करतानाच महाद्वाराच्या कमानीवर नगाडे शहनाई बसवलेले दिसतील. शिवाय अजमेर शरीफवाले बाबा यांनी शाकाहाराचा आग्रह धरला होता. आपल्या खानखाह परिसरात त्यांनी मांसाहारावर बंदी घातली होती. भारतीय लोकांच्या आस्था भावनांचा आदर करत त्यांनी गोड प्रसाद सुरु केला होता. हजरत हमीदोदिन नागोरी र. अ. यांनी आयुष्यभर शाकाहाराचे व्रत पाळले होते. दिल्लीच्या तुघलक बादशाहाने पंजाबमधील घुमान येथील नामदेवजींचे मंदिर जैन शैलीत बांधलेले आहे.सम्राट बाबरच्या यमुना काठी असलेल्या स्वतःच्या खाजगी बागेचे नाव रामबाग होते.
शीख आणि मुस्लिमांचे गंगा जमुनी नाते :
शीखधर्म आणि सुफी संतांचं ही फार जवळचं नातं राहिलेले आहे. गुरु नानक देवजी मुस्लिम,गैरमुस्लिम दोघांमध्येही लोकप्रिय आहेत. शीख धर्मात हजरत बाबा फरीद र.अ. यांचे योगदान आदरपूर्वक मान्य केलेले आहे. तसेच भाई मरदाना हे गुरु नानक देवजींसोबत राहणारे मुस्लिम सेवक होते. गुरु नानक हे मक्केत जाऊन काबा दर्शन घेऊन आलेले पहिले भारतीय गैरमुस्लिम होते. तिकडे त्यांना सुफी, औलिया म्हणून संबोधतात. अमृतसरच्या सुवर्ण मंदिराची पहिली विट हजरत मियां मीर र.अ. यांनी ठेवली आहे. ते कादरीया परंपरेचे लोकप्रसिद्ध लाहोरचे सूफी होते.हजरत पीर बुद्धू शाह या मुस्लिम सूफी संताने गुरु गोविंदसिंहांना युद्धात मदत केली होती. चमकौर साहिब मधील लढाई नंतर गुरु गोविंद सिंह यांना दोन मुस्लिम भाऊ भाई गणी खान आणि भाई नबी खान यांनी खांद्यावर खाट घेऊन सुरक्षित ठिकाणी पोचवले होते. त्यावेळी मुघलांना चुकवण्यासाठी ते म्हणत हे उच्च के पीर आहेत! शिखांनी जी लंगर सेवा स्वीकारली ती सुफींकडून स्वीकारलेली आहे. सुफी आपल्या खानखानाहमध्ये आल्यानंतर कोणालाही उपाशी जाऊ देत नव्हते. शीख सुद्धा गुरुद्वारात आल्यावर कोणालाही उपाशीपोटी जाऊ देत नाहीत.
उस्ताद बिस्मिल्ला खान हे काशीमध्ये हिंदू समाजात शहनाई वाजवायचे. हिंदू लग्न पद्धतीत वाजणारी शहनाई ही एका मुस्लिम शहनाई वादकाची आहे. या संदर्भात अनेक उदाहरणे गंगा-जमुनी तहजीब म्हणून देता येतील. संत कबीर हे उत्तरेकडील या तहजीबचे सर्वात लोकप्रिय उदाहरण म्हणून मानले जातात.
महाराष्ट्राची समन्वयवादी जडणघडण :
महाराष्ट्राची जडणघडण देखील समन्वयाची, सलोख्याची आहे. नर्मदेच्या पलीकडील उत्तरेकडील आणि द्रविड दक्षिण भारतीय संस्कृती-परंपरांचा मिलाफ महाराष्ट्रात होतो. दोन भिन्न संस्कृतीच्या समन्वयाचे केंद्र महाराष्ट्र आहे. सलोखा हे या भूमीचे खास वैशिष्ट्य आहे. या भूमीवर कुणालाही कट्टर कर्मठपणा बाळगता येत नाही. या संस्कृतीला दख्खनी संस्कृती देखील म्हटले आहे.
मुस्लिम शासकांच्याही अगोदर महाराष्ट्राच्या भूमीवर सूफी आलेले आहेत.हिंदू राजांच्या राजवटीत अनेक सूफी येऊन महाराष्ट्रात चिरनिद्रिस्त झालेले आहेत. ज्यामध्ये हजरत सय्यद मुहम्मद मोमीन आरिफ बिल्ला र.अ. (१२००) व हजरत शेख शाह जलालुद्दीन गंजे ख्वाज र.अ. (१२७८) ही दोन नावे दख्खनचे पहिले सूफी म्हणून घ्यावी लागतात. यादव राजांच्या राजवटीत देवगिरी किल्ल्याच्या समोर व भोवती हे दोन सूफी येवून राहिलेले आहेत. तर कोल्हापूरच्या पन्हाळा येथे आलेले सूफी संत साधोबा ( हजरत शहादुद्दीन कत्त्ताल वली र. अ. ) यांनी नबीपूर हे गाव वसवलेले आहे. नबी हे इस्लामिक नाव आहे तर पूर हे मराठी नाव आहे. शहापूर, पीराची वाडी, शहागड, अलीपुर, फकीरवाडी अशी इस्लामी आणि महाराष्ट्रीयन मराठी या दोन्ही संस्कृतीचा समन्वय असणारी अनेक गावांची नावे या गंगाजमणी परंपरेचे उदाहरण म्हणून बघता येईल.कंधार, मिरज ही नावे देखील सूफींच्या सहचर्यातून आलेली आहेत. मिरजेच्या हजरत सय्यद शमसुद्दीन शहीद गंजबक्ष र.अ. यांच्या दर्गाहात भारतीय संगीताला विशेष महत्त्व आहे. बालगंधर्व यांनी या मिरासाहेब दर्गाहमध्ये गायण केलेले आहे. आजही हिंदू संगीतकार संगीताचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर,आपला पहिला गायनाचा प्रयोग करण्यासाठी देशभरातून या मिरासाहेब दर्गाहांमध्ये येतात. या दर्गाहातील मजारी समोर गायन करून ते व्यावसायिक क्षेत्रात उतरतात. मिरजेच्या या मिरासाहेब दर्गाहाचा उरूस चर्मकार घराण्याने चूना लावल्याशिवाय सुरू होत नाही. या दर्गाहातील बऱ्याच प्रथा गैरमुस्लीमांच्याकडे आहेत. परभणीच्या तुरुतपीर दर्गाहाचे पुजारी हिंदू आहेत. अनेक दर्गाहांतील मुख्य प्रथा हिंदूंकडे आहेत. चाळीसगावच्या हजरत पीर मुसा कादरी र.अ. यांच्या दर्गाच्या उरूस काळात मुख्य तलवारीचा मान मराठा देशमुख घराण्याकडे आहे. उरूसाच्या काळात देशमुखांच्या घरून तलवार आणून दर्गाहमध्ये पूजली जाते.कोल्हापूरच्या बाबु जमाल दर्गाहाच्या प्रवेशद्वारावर गणपतीचे शिल्प आहे. दर्गाह मध्ये वाकून प्रवेश करताना वर दर्शनी भागात हा गणपती आपल्याला दिसतो. पन्हाळ्याच्या साधोबा दर्गाहाला कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने सोन्याचा नारळ अर्पण केलेला आहे. दर्गाहसाठी जमीन व गाव इनाम दिलेले आहे. तर मालोजीराजे भोसले यांनी आपल्या मुलांची नावे शहाजी आणि शरिफजी ही नगरच्या शहा-शरीफ दर्गाहावरून ठेवलेली आहेत.स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी अकोला जिल्ह्यातील बाळापुरच्या नक्शबंदी परंपरेच्या दर्गाहाला कायमस्वरूपी मासिक वेतन सुरू केले होते. तसेच महादजी शिंदे यांनी बीडच्या हजरत मंसूर शाह वली र.अ. यांना गुरुस्थानी मानून, बीडला त्यांची भव्य अशी संगमरवरी दगडात दर्गाह बांधली आहे. आणि या दर्गाहाला मोठी जमीन दान दिलेली आहे. ग्वाल्हेरचे शिधियांचे आजचे सर्व वंशज दरवर्षी या दर्गाहाला दर्शनाला येतात.
अशा प्रकारे अनेक सूफींना हिंदू राजांचा राजाश्रय मिळाला होता. तर मुस्लिम राजवटीतही हिंदू सरदारांनी सूफींची सेवा केल्याचे निदर्शनास येते. देवगिरी किल्ल्यावर नोकरीला असणारे संत जनार्धन स्वामी यांनी सूफी संत हजरत चाँद बोधले र.अ. यांना गुरु मानले होते. आपल्या गुरुच्या समाधीचे व दर्गाहाचे बांधकामही संत जनार्धन स्वामींनी केलेले आहे.
वारकरी संतांची गंगा – जमुनी समन्वयवादी भूमिका :
पुढील काळात संत तुकाराम महाराज आणि बाबा अनगडशाह यांच्याद्वारे सूफी–वारकरी समन्वयाचा गंगा-जमुनी तहजीबचा वारसा आपल्याला दिसून येतो. आजही संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा विसावा या दर्ग्यात असतो. तुकोबारायांच्या पादुका दर्गात नेल्या जातात विठ्ठलाची तुकोबारायांची आरती होते. आणि मग पालखी पुढे प्रस्थान करते. संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या साहित्यात इस्लामी शब्द सापडतात. अल्लाह या शब्दाचा उल्लेख तर संत तुकोबाराय आणि संत एकनाथ महाराजांनी केला आहे. आम्ही विटेवर विठ्ठलाच्या रूपात अल्लाहच पाहतो, असे स्पष्टपणे सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात,
” एका जनार्दनी निजवत अल्लाह l
अस्सल ओ ही विटकर अल्ला ll ”
महाराष्ट्राची संस्कृती व सभ्यता कशी आहे, हे सांगताना संत तुकाराम महाराजांनी ‘पवित्र ते कुळ, पावन तो देश’ हा अभंग लिहिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वर्णाभिमानाने कोणी मोठे होत नाही; तर त्याचे कर्म, त्याची भक्ती आणि त्याचे आचरण चांगले असावे. हे सांगताना तुकाराम महाराजांनी जात, धर्म, पंथ, वंश किंवा संप्रदाय न बघता, जे माणुसकीने भगवंतभक्ती करत राहिले त्या सर्वांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे.यामध्ये संत तुकाराम महाराजांनी तीन मुस्लिम संतांचाही आदरपूर्वक उल्लेख केला आहे. ते म्हणतात,
कबीर, मोमीन, लतीफ मुसलमान ।
सेना न्हावी जाण विष्णुदास ॥५॥
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या काळात विदर्भ आणि ठिकठिकाणाहुन मुस्लिम संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात. श्रीगोंद्याच्या शेख मोहम्मद महाराज यांची देखील पालखी पंढरपूरला येते. महाराष्ट्रात वारकरी परंपरेत अनेक ठिकाणी मुस्लिम टाळकरी, भारुड सम्राट आणि कीर्तनकार आपल्याला बघायला मिळतात. वारकरी सांप्रदायात गंगाजमणी परंपरेचा मिलाफ ज्ञानाचा-एका, नामाचा-तुका आणि कबीराचा शेखा म्हणून सांगितला जातो.
मढीची यात्रा पैठण येथील हजरत सय्यद सादात दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर सुरू होते. गोदावरीचे पाणी मढीच्या समाधीवर अर्पण केले जाते. नाथपंथी कानिफनाथ बाबा यांनी या दर्गाहवर, सूफींच्या सान्निध्यात १२ वर्षे तप केले असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी त्यांनी पाणी भरल्याचे सांगितले जाते आणि तसा रांजणही दाखवला जातो.शहागडचे मुस्लीम संत, संत शहामुनी हे महानुभावांमध्ये आदरस्थाणी मानले जातात. त्यांचा सिद्धांतबोध हा ग्रंथ महानुभावांच्या घराघरात वाचला जातो.
साधुसंत आणि सुफिंचा एकमेकांशी सलोखा :
अशा प्रकारे सूफी संत आणि वारकरी, महानुभाव, नाथ पंथाचा संबंध परस्परांशी सलोख्याचा असल्याचे आपल्याला लक्षात येते. अनेक ठिकाणी तर हिंदू संत आणि मुस्लीम सुफी संत मठ आणि खाणखाह स्थापून जवळजवळ रहायचे. त्यांचे एकमेकांकडे जाणे-येणे, उठणे-बसणे असे. सनवार,उत्सवात एकमेकांकडे सहभोजनाला हे जात असत. महत्त्वाच्या प्रसंगी मौल्यवान भेटवस्तू एकमेकांना देत असत. अकोला जिल्ह्यातील, तालुका असणाऱ्या बाळापूर शहरालगतच्या अलीकडील नदी तीरावर नक्शबंदी परंपरेचा दर्गाह मठ आहे, तर समोरील नदीकिनारी वैष्णव पंथी गोसावी मठ आहे. दोन्ही मठांचे एकमेकांकडे मोठ्या सण-उत्सवाला जाणे-येणे असे.या दोन्हीही मठांचे प्रमुख संत गंगागीर महाराज आणि सुफी संत हजरत इनायतउल्ला नक्षबंदी र.अ. यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध होते. उदगीरचे उदगीर बाबा आणि सूफी संत हजरत ख्वाजा सदरोद्दीन बादशाह र.अ. यांचे एकमेकांशी जाणे-येणे होते, अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध दोघांमध्ये होते. संत उदागीर स्वामी यांनी भेट दिलेला शंख सूफी संत हजरत ख्वाजा सदरोद्दीन बादशाह र.अ. यांच्या दर्गाहात आहे. दौलताबादचे संत मानपुरी प्रसाद आणि सूफी संत हजरत शाहनुरमिया हमवी र.अ. यांचे एकमेकींशी सलोख्याचे संबंध होते. हे दोघेही सुलतानगडावर ‘हापसेदम’ नावाची योग साधना एकत्र करायचे. महाराष्ट्रभर नाथ आणि सूफी यांचे नातेही जिव्हाळ्याचे होते. उत्तर भारतात तर नाथपंथीय समाधींना पिर म्हनन्याचा प्रघात आहे. ही एकात्मतेची, एकसंधतेची अटूट वीण महाराष्ट्राने जागोजागी जपली आहे.
महाराष्ट्रातील गावोगाव असणारे हिंदू मुस्लिम सलोख्याचे संबंध :
सबंध महाराष्ट्रभरात गावोगावी हिंदू मुस्लिमांमध्ये सलोख्याचे संबंध दिसून येतात. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये काही सणांचे मंदिरांचे उत्सवांचे मुख्य मानपान मुस्लीम घराण्याकडे आहेत.लहुळच्या संत कुर्मादासांच्या मंदिराचे एक पुजारी मुस्लीम आहेत. मुजावर म्हणून त्यांना मंदिराची जमीनही आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सारोळा पीर गावात पोळ्याला बैलपुजेचा पहिला मान मुस्लीम घराण्याकडे आहे. तर परभणी जिल्ह्यातील तरोडा गावात देखील बैलपोळ्याचा मान ‘पटेल’ या मुस्लीम घराण्याकडे आहे. महाराष्ट्रीय भाऊबंद इस्लाममध्ये दाखल झाले तरी पूर्वीचे गावकीचे मानपान मात्र त्यांच्याकडे तसेच पूर्ववत हिंदू लोकांनी ठेवलेले आहेत. अनेक विधी, रिवाज, सण हिंदूप्रमाणेच महाराष्ट्रीय मुस्लीमांतही होतात. अरबस्तानात हळदीचे पिक येणे तसे मुश्कीलच, त्यामुळे लग्नपद्धतीत असणारी हळदीची रसम ही भारतीय आहे. महाराष्ट्रातील मुस्लीमांच्या लग्नामध्ये (हळद लावणे),आदल्या दिवशी हळदीची रसम मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुस्लीम वृद्ध स्त्रिया लुगडे परिधान करत असत तर वृद्ध मुस्लीम पुरुष मोठी पोकळ, पांढरी विजार, डोक्यावर गांधी टोपी वापरत असत. महाराष्ट्रातील मराठी मुसलमानांची आडनावे देखील याच धरतीवरली आहेत. खोंडे, चौधरी, देशमुख, पानसारे, तांबोळी, अशी अनेक आडनावे हिंदुतही आणि मुस्लिमांमध्येही आहेत.पूर्वीला गाव खेड्यात हिंदू स्त्रियांना बांगड्या भरणारे कासार मुस्लिम असायचे, मंदिराच्या बाहेर पूजेची सामग्री विकणारे मुस्लिम दुकानदार असतात. हे सगळं इतकं एक संघ आहे की याला वेगळं करता येत नाही. अनेक गावांमध्ये एकही मुस्लिमांचे घर नाही पण तिथे दरगाह किंवा पीर आहे आणि दरवर्षी गावातील हिंदू लोक इस्लामी रीवाजाप्रमाणे दर्गाहची रंगरंगोट्या करून उरूस साजरा करतात पूजाअर्चा करतात.
मुस्लिम राज्यकर्त्यांच्या गंगाजमुनी भूमिका :
यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे दख्खनच्या मुस्लीम शासकांनीही हिंदू-द्रविड संस्कृतीचा सन्मान केला होता. विजापूरच्या आदिलशाहीचा दुसरा इब्राहिम आदिलशहा (१५८०-१६२०) हा सरस्वतीचा भक्त होता. त्याने नवरसांवर ‘किताब-ए-नवरस’ हा ग्रंथ लिहून त्याची सुरुवात सरस्वती स्तवनाने केली आहे. या राजाच्या नावापुढे जगद्गुरु लावले जाई. त्याने लिहिलेला हा ‘किताब-ए-नवरस’ हा दख्खनी गंगा-जमुनी परंपरेचा अनोखा मिलाफ मानला जातो.
अहमदनगरच्या निजामशाहीत फारसी नंतर ‘मराठी’ ही देखील राजभाषा म्हणून वापरली जायची. इमादशाहीची राजभाषा मराठी होती. दख्खनच्या मुस्लीम राज्यकर्त्यांनीही मराठी भाषेला सन्मान दिल्याचे कागदपत्र, ताम्रपट, दान दिलेले दस्तऐवज जागोजागी उपलब्ध आहेत. आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या महाद्वारावरील नगारखाना निजामाने बांधलेला आहे.
शेवटी माणुसकी महत्त्वाची :
माणुसकीच्या विचारापासून वेळोवेळी कुणी दूर जाऊ नये म्हणून महाराष्ट्रात सूफी-साधू-संत-शरण-महंतांनी प्राणांची बाजी लावून कार्य केले आहे. एकसंघतेची, माणुसकीची सामाजिक विण उसवू नये म्हणून अनेक महामानवांनी सतत प्रयत्न केलेले आहेत. सुख-दुःखाच्या काळात हिंदू मुस्लीमांच्या मदतीला जातात, तर मुस्लीमही हिंदूंच्या मदतीला जातात. महात्मा जोतीराव फुले यांना घरातून बाहेर काढल्यानंतर आधार देणारे उस्मान शेख आणि फातिमा शेख हे होते. तर महाडच्या १९२८ च्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सभेसाठी आणि सत्याग्रहींना रहायला जागा देणारे महाडचे मुस्लीम होते. कायदेशीर परवानगी नगरपालिकेने टिपणिसने जरी दिली असेल तरी बाकी सोय मुस्लीमांनीच केली होती.
महाराष्ट्राच्या मराठी भाषेतही उर्दू, फारसी या भाषांची फार मोठी रसमिसळ आहे. भाषा भेदभाव करत नाही. त्यामुळे मराठी भाषेत इतर अनेक भाषेतून आलेले शब्द भाषेचे सौंदर्य वाढवणारेच ठरले आहेत.
अशी ही महाराष्ट्राची एकात्मतेची,एकसंघतेची,समन्वयाची, सलोख्याची महाराष्ट्राची गंगा जमुनी परंपरा आहे. ती काही आज किंवा काल आकाराला आलेली नाही. हजार वर्षापासून ही परंपरा एकमेकांना समजून घेत उभी राहिली आहे. तिला कोणीही नस्ट करायचा, गालबोट लावायचा प्रयत्न जरी केला, तरी ते तितकं सहजासहजी शक्य नाही.अहो ज्या गावात एकही मुसलमानाचं हिंदी बोलणारं घर नसेल तरीही बापलेकं, भाऊ- भाऊ शेतात काम करताना एकमेकांना हिंदीत बोलतात. ते इतकं रुजलं आहे.
रसूलल्ला सल्ललाहू अलैही वस्सलम मुहम्मद पैगंबर जेव्हा मक्केत आले, तेव्हा स्थानिकच्या लोकांनी आम्हाला भांडणे,युद्ध नको आहे म्हणून पैगंबर साहेबांच्या समोर एक करार करण्याचा प्रस्ताव ठेवला. सर्वात जाणते आपणच असल्यामुळे तो करार आपणच लिहावा असंही ठरलं. स्थानिकला असणारे ज्यू, ख्रिश्चन आणि गटागटात विभागलेले अरब यांच्यात भांडणे होऊ नयेत म्हणून पैगंबर साहेबांच्या द्वारे एक समन्वयाचा करार झाला.हा करार याच गंगाजमुनी परंपरे सारखा समन्वयाचा ठरला. आधुनिक काळातील जागतिक लेव्हलच्या सर्व समन्वयवाद्यांसाठी हा करार प्रेरक मानला जातो.
महाराष्ट्राच्या गंगा जमुनी परंपरेचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे महात्मा फुले यांनी रसूलल्ला सल्ललाहू अलैही वस्सलम मुहम्मद पैगंबर यांचा पोवाडा लिहीला तर साने गुरुजी यांनी स.पैंगबर यांचे अत्यंत सुंदर आणि भावनिक असे चरीत्र लिहीले आहे.
नितीन सावंत परभणीकर
9970744142
दि. 5 सप्टेंबर 2025
( स.पैंगबर जयंती )