जगाला मार्गदर्शक ठरेल असे काम शाहू महाराजांनी केले-प्रा. शरद शेजवळ येवला महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान


जगाला मार्गदर्शक ठरेल असे काम शाहू महाराजांनी केले-प्रा. शरद शेजवळ येवला महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान
येवला, (प्रतिनिधी):- राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे प्रगतिशील आणि समाजहितैषी शासक होते. ते सामाजिक न्यायाचे अग्रदूत आणि वंचितांचा खऱ्या अर्थाने कैवार घेणारे राजे होते. त्यांनी जगाला मार्गदर्शक ठरेल असे काम केले, असे प्रतिपादन प्रा. शरद शेजवळ यांनी केले. ते महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे बोलत होते. महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. सदरील कार्यक्रमात बोलताना पुढे ते म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक समता, शिक्षण हक्क आणि सामाजिक न्याय याचे आद्य प्रवर्तक होते. त्यांनी बहुजन उद्धाराचे काम केले. सर्व स्तरातील लोकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले.  अस्पृश्य म्हणून हिणविलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या संस्थानात आरक्षण धोरण लागू केले.   माणूस हा कर्मावरून मोठा असतो जन्मावरून नव्हे असे म्हणत तथाकथित जातव्यवस्था त्यांनी अमान्य केली. शिक्षण हेच खरे बळ आहे असे ते मानत. समता, बंधुता आणि न्याय हेच खरे धर्माचे तत्व असले पाहिजे असे शाहू महाराजांनी सांगितले. शाहू राजांनी लोकशाहीची पायाभरणी केली असेही शेजवळ म्हणाले. तसेच आपण संतांना, सुधारकांना, महामानवांना जातीजातीमध्ये बंदिस्त करत असल्याची, जात मानसिकता पुन्हा बळकट होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्या धडावर आपलेच डोके ठेवून फुले-शाहू-आंबेडकरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेला मार्ग आपण सोडू नये असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला. सदरील कार्यक्रम प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. गमे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना मिळालेल्या अल्प आयुष्यात कामाचा भला मोठा डोंगर उभा केला. त्यांनी सामाजिक न्यायाची बाजू जोरकसपणे लाऊन धरली. सामाजिक सुधारणांबरोबरच शेतकऱ्यांचे हक्क व न्याय त्यासाठी अनेक कृषी सुधारणा केल्या. शाहू महाराज हे सामाजिक समता, सामाजिक न्याय आणि सामाजिक शिक्षण याचे प्रेरणास्थान होते असेही ते म्हणाले. यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉ. रवींद्र ठाकरे, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. वैभव सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रामप्रसाद वाव्हळ यांनी केले तर आभार डॉ. निलेश नाईक यांनी मानले. यावेळी प्राध्यापक,  प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!