प्रा.शरद शेजवळ यांना विश्वबंधुता साहित्य परिषदेचा राष्ट्रीय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान
प्रा.शरद शेजवळ यांना विश्वबंधुता साहित्य परिषदेचा राष्ट्रीय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान
येवला (आवेश कुरेशी):- विश्वबंधुता साहित्य परिषद पुणे यांच्यावतीने ग्रंथालय चळवळीत विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा राष्ट्रीय विश्वबंधुता साहित्य परिषदेचा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय तथा राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिकेचे संस्थापक प्रा.शरद विमल दिनकर शेजवळ जेष्ठ समाजवादी विचारवंत प्रा.सुभाष वारे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
पुणे येथे २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनात विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे स्वागताध्यक्ष उद्योजक कृष्णकुमार गोयल प्रा.शंकर आथरे उपस्थित होते.
प्रा. शरद शेजवळ यांनी मुक्ती भूमी सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिकेची स्थापना 2018 रोजी केली असून येवले शहरात ग्रामीण,शेतकरी,कामगार,कष्टकरी मुला-मुलींसाठी हे वाचनालय व अभ्यासिका मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे मौल्यवान ग्रंथ पुस्तके व मार्गदर्शन येथे दिले जात असून येथील अनेक मुले-मुली वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यशस्वी झाले आहेत.
समाजातील सर्व घटकातील विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी ज्ञानदान व साधन सुविधा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती संचलित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिकेच्या मार्फत शरद शेजवळ यांनी उपलब्ध करून दिली आहे,त्यांच्या या कार्याची दखल पुरस्काराच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
राष्ट्रीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार मिळाला बद्दल सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शरद शेजवळ यांचे अभिनंदन केले आहे.