प्रा.शरद शेजवळ यांना विश्वबंधुता साहित्य परिषदेचा राष्ट्रीय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार घोषित
प्रा.शरद शेजवळ यांना विश्वबंधुता साहित्य परिषदेचा राष्ट्रीय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार घोषित
येवला (प्रतिनिधी) विश्वबंधुता साहित्य परिषद पुणे यांच्यावतीने ग्रंथालय चळवळीत विशेष उल्लेखनीय कार्यक्रम करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा राष्ट्रीय विश्वबंधुता साहित्य परिषदेचा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय तथा राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिकेचे संस्थापक प्रा.शरद विमल दिनकर शेजवळ यांना घोषित झाला आहे.
शनिवार दिनांक १२एप्रिल २०२५ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध साहित्यिका अश्विनी धोंगडे,ज्येष्ठ समाजवादी विचारवंत २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.सुभाष वारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शरद शेजवळ यांना सन्मानपूर्वक देण्यात येणार असल्याची माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे स्वागताध्यक्ष उद्योजक कृष्णकुमार गोयल प्रा.शंकर आथरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रा. शरद शेजवळ यांनी मुक्ती भूमी सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिकेची स्थापना 2018 रोजी केली असून येवले शहरात शेतकरी कामगार कष्टकरी मुला-मुलींसाठी हे वाचनालय व अभ्यासिका मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे मौल्यवान ग्रंथ पुस्तके व मार्गदर्शन येथे दिले जाते.येथील अनेक मुले-मुली वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यशस्वी झाले आहेत.
समाजातील सर्व घटकातील विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी ज्ञानदान व साधन सुविधा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती संचलित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिकेच्या मार्फत शरद शेजवळ यांनी उपलब्ध करून दिली आहे,त्यांच्या या कार्याची दखल पुरस्काराच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.