मनमाड महाविद्यालयातर्फे अंकाई येथे ऐतिहासिक गड किल्ले संवर्धन कार्यशाळा ऐतिहासिक वास्तूंचे जतन काळाची गरज : डॉ संजय पाईकराव
मनमाड महाविद्यालयातर्फे अंकाई येथे ऐतिहासिक गड किल्ले संवर्धन कार्यशाळा ऐतिहासिक वास्तूंचे जतन काळाची गरज : डॉ संजय पाईकराव
मनमाड(अजहर शेख):- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने अंकाई किल्ला तालुका, येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास संशोधन विभागाचे प्राध्यापक डॉ संजय पाईकराव, शिवव्याख्याते समाधान हेंगडे-पाटील, रासेयो जिल्हा समन्वयक डॉ डी के आहेर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बि. एस. देसले, डॉ किरण पिंगळे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ पवनसिंग परदेशी, प्रा. सोमनाथ पावडे त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. ऐतिहासिक स्थळे, लेणी, मंदिरे, वास्तु, महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेले विविध स्मारके आपल्या देशाचा शौर्याने भरलेला गौरवशाली इतिहास नव्या पिढीसमोर मांडत असतात, तसेच नव पिढीमध्ये संस्कार, भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा, शौर्य, सहिष्णता, सृजनता, वास्तुविषादक असे अनेक गुण शिकवतात परंतु नव पिढी सृजनशीलतेचे प्रतीक न बघता ह्या वास्तूंना मनोरंजनाचे प्रतीक बघतात. त्यासाठी कार्यशाळेचे आयोजन नव पिढीसाठी प्रेरक आहे, असे मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.अंकाई- टंकाई किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, जैन लेण्यांची सृजनशीलता- वास्तुकला याचे प्रत्यक्ष दर्शन या कार्यशाळेच्या माध्यमातून स्वयंसेवकांना अनुभवायला मिळाले. या कार्यशाळेसाठी श्री.अल्केश कासलीवाल, श्री किरण बडे, श्री नवनाथ सोनवणे, श्री. संतोषसिंग परदेशी, नरेंद्र भावसार, अंकिता दास सह रासेयो स्वयंसेवकांचे सहकार्य मिळाले. नाशिक जिल्ह्यातून ७५ स्वयंसेवकांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला. ऋतुजा जाधव हिने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक डॉ पी.बी परदेशी, तर आभार प्रा सोमनाथ पावडे यांनी केले.