उत्तराखंड: चमोलीत जोरदार हिमवृष्टीनंतर आता हिमस्खलनाचा इशारा, 3000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागात सतर्कतेच्या सूचना.
डेहराडून:
देशातील डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरूच आहे, हे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने उंच पर्वतांच्या दिशेने जात आहेत. उत्तराखंडमधील चमोलीतही गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. मात्र, उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आता हिमस्खलनाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. चमोलीतील तीन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागात हिमस्खलनाच्या धोक्याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय अधिकाऱ्यांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ची प्रयोगशाळा डिफेन्स जिओइन्फॉरमॅटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (DGRE) ने रविवारी उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात 3,000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर हिमस्खलनाचा इशारा येत्या 24 तासांत जारी केला. हा इशारा सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 24 तासांच्या कालावधीसाठी आहे.
चमोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद ओबेदुल्ला अन्सारी यांनी चमोली जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पत्र लिहून या क्षेत्रासाठी DGRE च्या ‘ऑरेंज अलर्ट’ (लेव्हल थ्री) कडे त्यांचे लक्ष वेधले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, सतर्कतेच्या दृष्टीने योग्य सुरक्षा आणि खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, असे ते म्हणाले.
चमोलीत नुकतीच मुसळधार बर्फवृष्टी झाली
या इशाऱ्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई आणि खबरदारीची अपेक्षा पत्रात करण्यात आली आहे. याशिवाय इतर अधिकाऱ्यांनाही अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आले आहे.
चमोली जिल्ह्यातील 2,500 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागात गेल्या काही दिवसांत जोरदार बर्फवृष्टी झाली आहे, तर सखल भागात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे.