राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतीचे संगणकपरिचालक २६ ऑगस्टला मुंबईत धडकणार !
राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतीचे संगणकपरिचालक २६ ऑगस्टला मुंबईत धडकणार !
मुंबई (महेश पेवाल) ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागा अंतर्गत “आपले सरकार” प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून १२ वर्ष प्रामाणिक काम केलेल्या संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे किंवा कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने येत्या सोमवारी २६ ऑगस्ट पासून राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे २०,००० संगणकपरिचालक आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी होत असून शासन जो पर्यंत मागण्या मान्य करणार नाही तो पर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार केला असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त की,संग्राम व आपले सरकार या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायत मध्ये मागील १२ वर्षापासून संगणकपरिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत.परंतु शासनाने संगणकपरिचालकाना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे,तसेच मागे संगणकपरिचालकांच्या आंदोलनाची दखल घेऊन १६ मार्च २०२४ रोजी शासनाने ३००० रुपये मासिक मानधन वाढवल्याची घोषणा केली,त्यातच csc –spv या कंपनीचा करार ३० जून रोजी रद्द केला व १९ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प चालवण्यासाठी दिला,परंतु महाआयटीने सदरील प्रकल्प चालवण्यास नकार दिल्याने संगणकपरिचालकांना अद्याप कोणाकडूनही नियुक्ती मिळाली नाही,त्यात ग्रामविकास विभागाने ११ जानेवारी २०२३ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे आवश्यक असताना त्याकडे ग्रामविकास विभाग व शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे,या शासनाने दिलेल्या आश्वासनाची आठवण राज्य शासनाला करून देण्यासाठी व मागणी मान्य अकरून घेण्यासाठी येत्या सोमवारी २६ ऑगस्ट रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी बोलताना सांगितले आहे.