खासदार भगरे यांनी घेतली गायकवाड कुटुंबाची सांत्वन भेट…!


खासदार भगरे यांनी घेतली गायकवाड कुटुंबाची सांत्वन भेट…!
मनमाड(महेश पेवाल):- मनमाड नजीक असलेल्या खादगाव तालुका नांदगाव येथील वीज पडून मयत झालेल्या  विलास गायकवाड यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन राज्य सरकार तर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन खासदार भास्करराव भगरे यांनी दिले आहे.वीज पडून मृत्यू झाल्यास त्याचा राज्य आपत्तीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. अशा घटनांत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसाना चार लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या संदर्भातील आदेश महसूल खात्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने जारी केला आहे.
              राज्यात पावसाळ्यामध्ये वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार वीज पडून होणाऱ्या मृत्युचा समावेश नैसर्गिक आपत्तींच्या यादीत नव्हता. त्यामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसदारांना मदत देता येत नव्हती. या पार्श्‍वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 31 मे रोजी झालेल्या बैठकीत वीज पडून झालेले मृत्यू ही राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचना विचारात घेऊन वीज पडून मृत्यू होण्याच्या घटनांचा समावेश राज्य आपत्तीच्या यादीत करण्यात आला आहे.
वीज पडून मृत्यू झाल्यास योग्य त्या प्राधिकाऱ्याने मृत्यूचे कारण प्रमाणित करण्याच्या अधीन राहून मरण पावलेल्यांच्या वारसांना चार लाख रुपये मदत दिली जाणार आहे. याशिवाय जखमी झालेल्यांनाही द्यावयाच्या मदतीची रक्कम निश्‍चित करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्तीच्या सुधारीत निकष व दरानुसार ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि पुनर्वसन विभागामार्फत केली जाणार आहे. त्यामूळे स्व विलास गायकवाड यांच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यात येईल  असे  खासदार भास्करराव भगरे ह्यांनी उपस्थितांशी संवाद साधतना सांगितले. ह्या प्रसंगी शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश  धात्रक,तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, निलेश चव्हाण, दर्शन आहेर ह्या सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!