नांदगावला किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान…!
नांदगांव (महेश पेवाल ): अखेरच्या टप्प्यात आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५२.०८ टक्के मतदान झाले होते. शहर व तालुक्यातील मतदान केंद्रावर सकाळी सात ते न ऊ पर्यंत संथगतीने मतदान सुरू असल्याचे केंद्रावर दिसून आले.सकाळी7:00ते 9:00पर्यंत 7.3टक्के मतदान झाले होते. सकाळी 11:00 वाजेनंतर मतदानासाठी लांबच लांब रांगा लावून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आमदार सुहास कांदे यांनी मनमाड येथे मतदान केले. शहरातील कन्या विद्यालयात ब्यान्नव वर्षाच्या खैरुन्नीसा बांबू शेख यांनी व्हील चेअरवरुन येत मतदानाचा हक्क बजावला.
नांदगाव शहरातील कन्या विद्यालय, न्यु इंग्लिश स्कूल, रेल्वे विभागातील उर्दू शाळा,हमालवाडा,जुने तहसीलदार कार्यालय,शहरातील परिसरातील मतदान केंद्रावर व बुथवर युवक, युवती, महिला, पुरुष, व ज्येष्ठ नागरिक यांनी मतदानासाठी गर्दी केली होती. त्यामुळे मतदारांना काही बुथवर मतदानासाठी दहा ते पंधरा मिनिटांचे तर काही बुथवर अर्धा तासाच्या वर रांगेत उभे राहावे लागत होते तसेच मोबाईल मतदान केंद्रात नेण्यास पोलिसांकडून मज्जा होत होता त्यामुळे बहुतेक नागरिकांनी आणलेले मोबाईल बाहेर असलेल्या स्वयंसेवाकडे ठेवून मतदानाला गेले होते. सेल्फी काढण्यासाठी नगरपालिकेने सेल्फी पॉइंट उभारले होते त्याठिकाणी फोटो काढण्यासाठी मतदारांनी गर्दी केल्याचे दिसून आले. न्यु इंग्लिश स्कूल येथे महिलांसाठी विशेष केंद्र उभारण्यात आले होते.मतदान केंद्र क्र.169, न.प. शाळा क्र.2, हमालवाडा नांदगांव 10:35 ते 11:30 एक तास मतदान प्रक्रिया मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बंद पडली होती यामुळे नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागले. शहरातील अनेक मतदान केंद्रांवर भर दुपारी रांगा लागल्या आहेत. महिला मतदारांचाही मोठा सहभाग दिसून आला. शहरातील मतदान केंद्रावर विविध ठिकाणी निवडणूक प्रशासनाच्या वतीने मंडप व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान, नांदगाव शहरातील विविध मतदान केंद्रावर मतदारांची नावे यादीत नसल्याने त्यांना माघारी परतावे लागले. तर एका मतदार मतदानासाठी गेला असता त्याचे मतदान झाले असल्याचे त्याला सांगितले.जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या वेगवेगळ्या जनजागृतीपर कार्यक्रमांमुळे नांदगाव मतदारसंघांत काही प्रमाणात का होईना, मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. विशेषत: शहरी भागातील नागरिक मतदानाबाबत उदासीन असतात. मात्र, यंदाच्या निवडणुकीत शहरी भागातूनही बऱ्यापैकी मतदान झाल्याचे दिसून आले. यंदा दुपारीही शहरच नव्हे, तर तालुक्यात मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे दृश्य दिसून आले. विशेष म्हणजे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या विनंतीशिवाय मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करताना दिसले.जिल्ह्यात चर्चेत असलेल्या दिडोंरी लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 52.8 टक्के मतदान झाले. दिडोंरी मध्ये यावेळी डॉ. भारती पवार विरूद्ध भास्कर भगरे अशी लढत होत असून आमदार सुहास कांदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.