मनमाडला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मोठ्या थाटात लोकार्पण…!
मनमाडला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मोठ्या थाटात लोकार्पण…!
मनमाड(आमिन शेख) :- आपल्या सर्वांना मूलभूत सुविधांच्या विकासकामांसह,आपल्या सर्वांच्या अस्मितेचा विषय असलेल्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारेन असा जो शब्द दिला होता.त्याची आज पूर्ती करताना माझा आनंद द्विगुणित झाला आहे.असे भावनिक प्रतिपादन आ.सुहास कांदे यांनी केले.मनमाड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण
कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मंचावर अखिल भारतीय भिकु संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राहुल बोधी माजी नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे,राजेंद्र पगारे,बबलू पाटील,गंगाभाऊ त्रिभुवन,मयूर बोरसे,साईनाथ गिडगे,सौ.अंजुम कांदे,फरहान खान,प्रभारी मुख्याधिकारी विवेक धांडे, नगररचना अभियंता अझहर शेख,राहुल कुटे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार कांदे पुढे म्हणाले की,अनेक मोठ्या लोकांनी या मतदार संघाचे लोकप्रतिनिधित्व केले,पण ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागणी बाबत काही करू शकले नाही,ते भाग्य माझ्या वाट्याला आले.तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या. भविष्यात शिवसृष्टी सारखीच भीमसृष्टी उभारेन. असा शब्द देतो असे ते शेवटी म्हणाले. यावेळी पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी यांनी ही आमदार सुहास कांदे यांच्या कार्याचा गौरव केला.इतिहासात प्रथमच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाल्याची घटना अलौकिक असल्याचे सांगून हा क्षण मनात साठवून ठेवा असे ते म्हणाले.तसेच आमदार सुहास कांदे यांच्यासारखा लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला आहे.तुम्ही भाग्यवान आहात असेही ते शेवटी म्हणाले.या सोहळ्याला उपस्थित पूज्य भदंत डॉ. राहुल बोधी व आ.सुहास कांदे,व सौ.कांदे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.आज माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्यामुळे शहरातील विविध भागातून मिरवणूक काढून लोकार्पण सोहळ्याच्या ठिकाणी या मिरवणुकीची समाप्ती करण्यात आली.यानंतर सर्वपक्षीय नेते सर्व समाजातील पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक तसेच हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले आंबेडकर अनुयायी यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला मनमाडकर समाज बांधवांकडून आमदार सुहास कांदे यांचा नागरिक सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.लोकार्पण सोहळा सुरू असताना आकाशातून हेलिकॉप्टर द्वारे पुष्पृष्टी करण्यात आली, दोन हेलिकॉप्टर ने आकाशात सात वेळा घिरट्या मारत स्मारकावर पुष्पवृष्टी केली.लोकार्पण सोहळ्यानिमित्त कमालीचा उत्साह आनंद जल्लोष समाज बांधवांमध्ये पाहण्यास मिळाला.मनमाड शहरातील आंबेडकर पुतळ्यास विशेष महत्त्व आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दीक्षा देणारे भदंत यांनीच मनमाड शहरातील पुतळ्याचे उद्घाटन केले होते या दृष्टिकोनातून या पुतळ्यास विशेष महत्त्व प्राप्त होते.
——————————————————————-
मुस्लिम समाजाने जोपासले सर्व धर्म समभाव..!
आज झालेल्या लोकार्पण सोहळ्यात अखिल भारतीय भिकु संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राहुल बोधी व त्यांचा संघ आला होता या भिकु संघाला शहरातील फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचतर्फे चिवर(वस्त्र) दान करण्यात आले यामुळे मुस्लिम समाजाने सर्व धर्म समभाव जोपासल्याचे दिसून आले.
——————————————————————-
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीने सर्वांची मने जिंकली..!
मनमाडला आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण होते या लोकार्पण सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे उद्घाटन वेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली या पुष्पवृष्टीने उपस्थितीताची मने जिंकली.
क्षणचित्रे….!
हेलिकॉप्टरद्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी…
कार्यक्रमाला दीड तास उशीर झाला तरी नागरिकांची लक्षणीय उपस्थिती…
हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी करत असताना हवेमुळे मंचावर लावलेले डिजिटल फलक उडाले…
संपूर्ण शहरात जागोजागी डिजिटल फलक व आकर्षक विद्युत रोषणाई…
सायंकाळी लेझर शोने उपस्थिताच्या डोळ्याचे पारणे फेडले..
फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे भिकु संघाला चिवर(वस्त्र) दान…